लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा याचा निर्णय रविवारी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून घेतला जाणार आहे. जिल्हा काँग्रेससह प्रदेश समितीने सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची शिफारस केली असून केंद्रीय नेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेसने निवडणुकीची स्थानिक पातळीवर तयारीही सुरू केली आहे.

उबाठा शिवसेनेने सांगली मतदार संघासाठी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री डॉ.विश्‍वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी दिल्लीत जाउन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सांगली मतदार संघात काँग्रेसला अनुकूल स्थिती असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेही सांगलीतून निवडणूक लढविण्यास राजी झाले आहेत.

आणखी वाचा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जागावाटप जाहीर; अहमदनगरमधून निलेश लंकेच्या नावाची घोषणा

रविवारी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार असून यावेळी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सांगलीसह राज्यातील अन्य पाच जागाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.यावेळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी हेही उपस्थित राहणार असून या बैठकीनंतर जर उबाठा शिवसेनेने सांगलीच्या जागेवरील हक्क कायम ठेवला तर मैत्रीपूर्ण लढत अंतिम करून तसे निर्देश प्रदेश व जिल्हा पातळीवर कळविण्यात येणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे स्पष्ट संकेत दिले असल्याने जिल्हा पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत. संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी नियोजनाबाबत कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चाही केली आहे. कोणत्याही स्थितीत यावेळी माघार घ्यायची नाही असा सूर कार्यकर्त्यांचा यावेळी होता.