सांगली : गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, कोयना, चांदोलीतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने सोमवारी दिला. कोयना, चांदोली धरणे भरण्याच्या मार्गावर असताना, कर्नाटकातील अलमट्टी धरण तुडुंब भरले आहे. कोयना धरणातून सायंकाळी ३३ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चांदोली धरणाच्या वक्र दरवाजातून सायंकाळी पाच वाजल्यापासून दहा हजार आणि पायथा वीजगृहातून १६३० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभागाकडून आज देण्यात आला.
जिल्ह्यात शुक्रवारपासून कमी अधिक सुरू असलेल्या पावसामध्ये कालपासून वाढ झाली. यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर पश्चिम घाट परिसरातही मुसळधार पाउस होत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना येथे १३३, महाबळेश्वर १२१ आणि नवजा येथे १५१ मिलीमीटर तर चांदोली येथे ८३ मिलीमीटर पाउस गेल्या २४ तासात नोंदला गेला.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कोयनेतून सोमवारी विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता ३३ हजार क्येसक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर चांदोली धरणाच्या वक्र दरवाज्यातून सायंकाळी पाच वाजलेपासून वक्र दरवाज्यातून दहा हजार आणि पायथा वीजगृहातून १६३० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा जलसंपदा विभागाकडून आज देण्यात आला.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात सर्वाधिक पाउस शिराळा तालुक्यात २४.५ मिलीमीटर नोंदला गेल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. तालुकानिहाय झालेला पाउस असा मिरज ११, जत ६.४, खानापूर १.६, इस्लामपूर १०.४, तासगाव ३.६, आटपाडी २.२, कवठे महांकाळ ४.१, पलूस ७ आणि कडेगाव ३.५ मिलीमीटर.
कोयना धरणात ९० टक्के तर चांदोली धरणात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पश्चिम घाटातील राधानगरी व पाटगाव ही दोन धरणे काठोकाठ भरली असून अन्य धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. १२३ टीएमसी क्षमतेचे कर्नाटकातील अलमट्टी धरण शंभर टक्के भरले असून महापूराचा धोका टाळण्यासाठी धरणातून सोमवारी सकाळी दहा वाजलेपासून सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.