सांगली : शिराळा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने कुसाईवाडी बंधारा फुटला असून यामुळे कुसाईवाडी, हुंबरवाडीचा संपर्क तुटला आहे. बंधारा फुटल्याने शेतजमिनीचेही नुकसान झाले असून वन विभागाने पुन्हा बंधारा बांधावा, अशी मागणी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केली.

कुसाईवाडी (ता. शिराळा ) ग्रामपंचायत हद्दीमध्ये हुंबरवाडी येथे वन विभागाने बांधलेला बंधारा फुटला असून त्याच्या पाहणी वेळी ते बोलत होते. श्री. नाईक म्हणाले, बंधारा फुटून पाणी वाहिल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय कुसाईवाडी व हुंबरवाडीचा संपर्क तुटला आहे. काही दिवसांपूर्वी मोठा पाऊस झाल्यानंतर या ठिकाणचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केली गेली. आता अचानक पडलेल्या पावसामुळे वन विभागाने बांधलेला मातीचा कच्चा बंधारा फुटून पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे रस्ता खचला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्याजवळपासची शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वनविभागाने काही वर्षांपूर्वी हा बंधारा बांधलेला होता. हा बंधारा यापूर्वी एक वेळा फुटून नुकसान झाले आहे. त्यावेळी बंधाऱ्याची दुरुस्ती केली गेली तेव्हा स्थानिक लोकांना, ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही. आता हुंबरवाडी येथील लोकांचा तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी. याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.