सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील खासगी शिक्षण संस्थांना लागू केलेल्या अन्यायी घरपट्टी आकारणी विरोधात तीव्र लढा उभारला जाणार आहे. या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही अन्यायकारक करवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ चालकांची एक व्यापक बैठक रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या अन्यायी घरपट्टी आकारणीबाबत सर्वांनीच तीव्र असंतोष व्यक्त करतानाच कायदेशीर व रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
या बैठकीस सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ कार्याध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, शशिकांत राजोबा, प्रा. एन. डी. बिरनाळे, विनोद पाटोळे, नितीन खाडीलकर, प्रा. शिवपुत्र आरबोळे, वैभव गुरव, नंदकुमार अंगडी, भारत दुधाळ, लगमाण्णा गडगे, प्रा. एम. एस. रजपूत, दिग्विजय चव्हाण व बी. जे. पाटील यांच्यासह शिक्षण संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील अनेकविध खासगी शिक्षण संस्थांमुळे बहुजन समाज शिकला. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत खासगी शिक्षण संस्थांचे योगदान लक्षवेधी आहे. या शिक्षण संस्थांचे कार्य हे धर्मादाय स्वरूपाचे आहे. त्यामुळे ग्रामीण विकास विभागाने ग्रामीण भागातील खासगी शाळांची घरपट्टी माफ केली.
या अन्यायी घरपट्टी आकारणी विरोधात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांना व्यापारी पध्दतीने घरपट्टी आकारणी करून दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात व पूर्वीप्रमाणे निवासी दराने या खासगी शाळांना घरपट्टी आकारणी करावी, अशी मागणी शिक्षण संस्था चालक यांच्यावतीने केली जाणार आहे. याशिवाय खासगी शिक्षण संस्था चालकांच्या अन्य विविध अडचणीही मांडल्या जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.