सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या प्रचाराची रणधुमाळी थांबणार असून अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी राजकीय उमेदवारांनी केली आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष असा तिरंगी सामना होत असून अखेरच्या दिवशी पदयात्रा, प्रचार सांगता सभा, रोडशो आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार सजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकाळी जनसंवाद मेळावा मिरजेत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहापासून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार खासदार पाटील यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
तसेच महाआघाडीतील उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ युवा नेते आदित्य ठाकरे सांगली दौर्‍यावर रविवारी येत असल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगितले. सकाळी त्यांचा सांगली शहरात प्रमुख मार्गावरून रोड शो होणार असून प्रचार सांगता सभा विटा येथे आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा – मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास हुकूमशाही; मला तुरुंगात जावे लागेल, सुशीलकुमार शिंदे यांचा भीतीयुक्त इशारा

हेही वाचा – सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा मिरजेत आयोजित करण्यात आली असून या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तत्पुर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सुरेश आवटी, संजय मेंढे आदींसह माजी नगरसेवक सहभागी होणार आहेत.