सांगली : पावसाने मंगळवारी उसंत दिली असली तरी ढगाळ हवामान कायम असल्याने रब्बी हंगामाची तयारी लांबणीवर पडली आहे. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत सरासरी ६.९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, मिरज तालुक्यात सर्वाधिक १७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर बेडग (ता. मिरज) या मंडळात सर्वाधिक म्हणजे ४८.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मिरजेत ३१.८ व सांगलीत ३८ मिलीमीटर पाऊस झाला.
सांगली मिरज शहरात झालेल्या जोरदार पावसाने विस्तारित भागासह सखल भागात पाणी साचले होते, तर गुंठेवारी परिसर असलेल्या शामरावनगरमध्ये रिकाम्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले आहे. चांगले रस्ते नसल्याने गुंठेवारीतील नागरिकांचे येण्याजाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने गावओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्र भरून वाहत आहे. रानात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामाची पूर्व तयारीची कामे लांबणीवर पडली असून, अद्याप पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने रब्बी हंगामाची पेरणी दसरापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १७.१, जत ५.५, खानापूर १०.८, वाळवा १, तासगाव ११.५, शिराळा निरंक, आटपाडी २.९, कवठेमहांकाळ ११.१, पलूस १.५ आणि कडेगाव १.१ मिलीमीटर.
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ३४.०२ टी.एम.सी. पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग कमी ठेवण्यात आला. सध्या १६३० क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. कर्नाटकातील अलमट्टी धरणात १२२.०८ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ९९ टक्के भरले आहे. या धरणात पाण्याचा २५ हजार क्युसेकने विसर्ग केला जात असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून मंगळवारी सांगण्यात आले.