सांगली : मंगलमूर्तीच्या आगमनाला काही तासांचा कालावधी उरला असताना सांगलीत श्रींच्या आगमनाच्या तयारीला मंगळवारी वेग आला. पूजा साहित्य, सजावट, फळे, खरेदीबरोबरच श्रींची मूर्ती निश्चित करण्यासाठी गणेश भक्तांची बाळगोपाळांसह धांदल उडाली होती. काही घरगुती गणेशाचे ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंगळवारी सायंकाळी आगमन झाले.
या वर्षी सांगलीच्या उंबरठ्यावरून महापूर परतल्याने गणेश भक्तांमध्ये गणेशोत्सवासाठी उत्साही वातावरण आहे. गेले दोन दिवस गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली असून सांगलीतील हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ, विश्रामबागमधील शंभर फुटी परिसरातील गणेश मंदिर, मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसर, सराफ कट्टा, तांदूळ मार्केट या परिसरात पूजा साहित्य, गणेशासाठी सजावट साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. याच बरोबर गणेशमूर्तीसमोर पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
काही सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे गेले चार दिवसापासून मिरवणुकीने स्वागत करण्यात येत आहे. झांज पथक, बेेंजो या बरोबरच ध्वनिक्षेपकांच्या भिंतीचा वापर या मिरवणुकीत करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस पथकाचे पथसंचलन सांगली व मिरज शहरात करण्यात आले. सोमवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केटमध्ये पोलिसांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकही करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी काही घरगुती गणेशाचे आगमन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात करण्यात आले. सांगलीत बापट बाल शिक्षण मंदिराच्या गणेशाचे बालगोपाळांच्या झांज पथकाच्या निनादात मिरवणुकीने आगमन झाले.
जिल्ह्यात सुमारे साडेपाच हजार सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे आहेत. ८० गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना यंदा राबविण्यात येत आहे. यामध्ये जत, आटपाडी, विटा आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांची संख्या जास्त आहे.
यंदाचा उत्सव ध्वनी मर्यादेचे पालन करून करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले असून याला मिरज तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील नरवाड, सोनी, बोलवाड, डोंगरवाडी, बेडग आणि शिंदेवाडी या गावात ध्वनिक्षेपक भिंतीचा वापर न करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तर या गावासह म्हैसाळ, भोसे, काकडवाडी, कळंबी, आरग, सुभाषनगरमधील १०९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपक भिंतीविना उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले.