काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील बाळासाहेब भवन येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये काहीवेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय निरुपम यांनीही माध्यमांशी बोलताना आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

संजय निरुपम काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेटीसाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान पुढे काय करायचे? यावर सविस्तर चर्चा झाली. परवा (शुक्रवारी ३ मे रोजी) दुपारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या प्रवेशासंदर्भातील बाकी सविस्तर माहिती ही पक्षाकडून देण्यात येईल. तसेच पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे जेवढेही लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रचार करणार असून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी ठाकरेंनी का नाकारली? ‘त्या’ ड्राफ्टमध्ये काय होतं? उदय सामंतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर अखेर आज शिक्कामोर्तब झालं आहे. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रवेशाबाबत माहिती दिली. तसेच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात होते. यावरही आता त्यांनी भाष्य केले. संजय निरुपम म्हणाले, “आता निवडणूक कुठे लढणार? नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय निरुपम हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढवण्याबाबत इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांनी याबाबत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केली होती. यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता ते तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.