महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी करत आहे. निवडणुकीची तयारी करत असतानाच मविआ नेते राज्यातल्या भाजपाविरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. या नव्या आघाडीला एक महिना झाला असला तरी मविआमधील प्रमुख चारही पक्षांमध्ये योग्य ताळमेळ पाहायला मिळालेला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआ नेत्यांसमोर सातत्याने वेगवेगळ्या अटी-शर्थी मांडत आहे, वंचितकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. तसेच वंचितचे प्रतिनिधी मविआच्या बैठकांमध्ये वेगवेगळे प्रस्ताव ठेवत आहेत. यावरून वंचितला खरंच मविआमध्ये राहायचं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसऱ्या बाजूला मविआच्या बैठकीवेळी प्रमुख तीन पक्षांचे (उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस) आधी चर्चा करतात. या चर्चेनंतर वंचितच्या प्रतिनिधींना बैठकीत सहभागी करून घेतलं जातं. यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआमध्ये आम्ही उपरे आहोत त्यामुळे आम्हाला अशी वागणूक दिली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबत केलेली वक्तव्ये पाहता मविआमधील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर मविआतील प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, येत्या ६-७ मार्च रोजी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरदेखील सहभागी होतील. कोणाला वाटत असेल की मविआमध्ये फूट पडली आहे किंवा आमच्यात काही मतभेद आहेत, तर मी स्पष्ट करू इच्छितो की, तसं काहीच नाही. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासह पुढे जाणार आहे आणि देश बदलण्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर अग्रेसर असतील. भाजपा सरकार उलथून टाकण्यात आंबेडकरांचा मोठा सहभाग असेल.

हे ही वाचा >> “…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी योजनांवर भाष्य केलं. तसेच महाविकास आघाडीत फूट पडलेली नाही, तसेच आमच्यात (मविआ नेत्यांमध्ये) मतभेद नाहीत हे स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की, “देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तर विरोधकांपाठोपाठ देशातील जनतेच्या घरांवर धाडी पडतील.” आंबेडकरांच्या या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आंबेडकर हे संविधान आणि लोकशाहीचे रखवालदार आहेत. ते प्रमुख चौकीदार आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं ते सत्य आहे. २०२४ ला जर भाजपाचं सरकार आलं तर सामान्य माणसाच्या घरीदेखील छापे पडायला सुरुवात होईल.