प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला असला तरी अद्याप मविआकडून वंचितला योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार वंचितच्या नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झालेलं नाही. चारही पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी रस्सीखेच चालू आहे. जागावाटपासाठी नुसत्या चर्चा चालू असून मविआ नेते अद्याप त्यातून कुठलाही निष्कर्ष काढू शकले नाहीत, अशी तक्रार करत प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाही प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करत आहे.
वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर राहील की नाही याबाबत अनेकजण साशंक असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही सुधारणांमध्ये विश्वास ठेवतो. समाज सुधारणं ही आमची प्राथमिकता आहे. राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना आमचे काही राजकीय अजेंडे असले तरी आमच्यासाठी सामाजिक सुधारणा अधिक महत्त्वाची आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सामाजिक सुधारणा करता करता जर आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे त्या सत्तेचा स्वीकार करू. आत्ता आपल्या देशात पौरोहित्य आणि धार्मिक विधींच्या अधिकारांबाबत मोठ्या सुधारणा होणं आवश्यक आहे.” प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथे टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टीबरोबरच्या संभाव्य युती-आघाडीवर भाष्य केलं.
“आमचा जातीवर आधारित पुरोहितशाहीला विरोध”
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपल्या देशात जे पुजारी, पुरोहित किंवा धार्मिक विधी करणारी जी मंडळी आहे, ती जातीच्या आधारावर आहे. म्हणजेच आज कुंभाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता, लोहाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता मर्यादित आहे. त्या-त्या पुरोहितांना त्यांच्या त्यांच्या समाजापुरती मान्यता आहे. त्याला इतर समाजात मान्यता नाही. त्यामुळे समाजात समता आणि अधिकार दोन्ही आणायचे असतील तर या क्षेत्रात सुधारणा होणं आवश्यक आहे. कारण हे खूप प्रतीकात्मक आहे.
हे ही वाचा >> सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जीवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
वंचितचे प्रमुख म्हणाले, आम्हाला असं वाटतं की, देशात जी जातीवर आधारित पुरोहितशाही चालली आहे ती कायद्याने पूर्णपणे बंद करायला हवी. यावर सरकारने बंदी घालायला हवी. त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी (ब्रह्मज्ञान) उभं केलं जावं आणि तिथून शिकून, उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे. धार्मिक विधी त्याच्यामार्फतच केले जायला हवेत. आरएसएस आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू शकतो.