महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच मविआ नेते राज्यातल्या भाजपाविरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र करत आहेत. अशातच एक महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. परंतु, एक महिन्यानंतरही मविआमधील प्रमुख चारही पक्षांमध्ये योग्य ताळमेळ दिसलेला नाही. वंचित बहुजन आघाडी सातत्याने वेगवेगळ्या अटी-शर्थी मांडत आहे, वंचितकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. तसेच वंचितचे प्रतिनिधी मविआच्या बैठकांमध्ये वेगवेगळे प्रस्ताव ठेवत आहेत. यावरून वंचितला खरंच मविआमध्ये राहायचं आहे का? असा प्रश्न पडतो. यावर मविआचे प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांना नक्कीच महाविकास आघाडीत यायचं आहे. मायावतींप्रमाणे ते वेगळी वाट निवडतील असं मला वाटत नाही. संपूर्ण आंबेडकरी समाज मोदींवर नाराज आहे. ज्या प्रकारे या देशात सध्याच्या सरकारकडून कायदा, संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातला दलित, आंबेडकरी आणि वंचित समाज अस्वस्थ आहे. त्यामुळे हे समाज आपापल्या नेत्यांवर प्रचंड दबाव निर्माण करत आहेत. काहीही झालं तरी अशी हुकूमशाही आता आपण सहन करायची नाही, अशी या समाजांची भूमिका आहे. त्यामुळे या देशातला अल्पसंख्याक, दलित, वंचित समाज एकजुटीने महाविकास आघाडीबरोबर उभा आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणी भाजपाची सुपारी घेऊन त्यांना मदत करेल. प्रकाश आंबेडकर हे त्या प्रकारचे नेते नाहीत.” संजय राऊत टीव्ही ९ मराठीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की, प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर येतील याची तुम्हाला खात्री आहे का? सध्याची राजकीय परिस्थिती, प्रकाश आंबेडकरांची वक्तव्ये, स्वबळाचा नारा, त्यांच्या मागण्या आणि प्रस्ताव पाहता युतीचा पोपट मेलाय असं बोललं जातंय, त्याबद्दल काय सांगाल? यावर संजय राऊत म्हणाले, युतीचा पोपट मेलाय असं तुम्ही म्हणताय. मुळात आमचा पोपट झालेलाच नाही. सर्वांना माहिती आहे की, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे गट) आधीपासूनच युती आहे. त्याचबरोबर राज्यातले डावे पक्षदेखील आमच्याबरोबर एकजुटीने उभे आहेत. त्यामुळे तुम्ही माध्यमांनी केवळ प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांवरून अशा प्रकारचा पोपटाचा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. राहिला प्रश्न प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचा तर आमची युतीच होईलच.

हे ही वाचा >> “फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून…”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला; जागावाटपावर म्हणाले…

खासदार राऊत म्हणाले, आम्ही यापूर्वीदेखील प्रकाश आंबेडकरांशिवाय लढलो आहोत. २०१९ ला आणि त्याआधीदेखील आम्ही त्यांच्याविना लढलो होतो. परंतु, यावेळी त्यांनीच इच्छा व्यक्त केली की मला तुम्ही महाविकास आघाडीत का बोलवत नाही? मीसुद्धा तुमच्याच विचारांचा आहे. मी संविधान वाचवण्यासाठी लढतोय. त्यामुळे आम्ही (मविआ) त्यांना आमच्याबरोबर घेतलं आहे. तसेच आम्हालाही वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर असायला हवी. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी सन्मानाने चर्चा केली आहे.