दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर शनिवारी (३ डिसेंबर) त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर प्रश्न विचारला. यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (३ डिसेंबर) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.”

“मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे”

“मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते, पण…”

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या येत असतील, तर त्यांनी आधी या शिव्या राज्यपालांना, भाजपा मंत्री आणि प्रवक्ंत्याना देऊन दाखवाव्यात.”

हेही वाचा : शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

“गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात. वादग्रस्त भाजपा प्रवक्त्यांना शिव्या देणाऱ्यांवर आम्ही फुलं उधळू. महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल. महाराष्ट्रात ढोंग्यांची लाट आली आहे. कुठलं यांचं शिवप्रेम. मोदींना रावण म्हटल्यावर त्यांची अस्मिता जागी होते, पण शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर अस्मिता जागी होत नाही. तेव्हा ते त्यांचा नाग फणा काढत नाहीत,” असं म्हणत राऊतांनी बंडखोरांवर सडकून टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on allegations of love jihad delhi shraddha walkar murder case rno news pbs
First published on: 03-12-2022 at 16:43 IST