देशभरात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत केलेल्या भाषणाची चर्चा पाहायला मिळत आहे. मोदींनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात फक्त ५ मिनिटं मणिपूरवर भाष्य करताना उरलेला पूर्ण वेळ फक्त काँग्रेसवर टीका करण्यात घालवला, अशा शब्दांत विरोधकांकडून या भाषणावर आक्षेप घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर भाजपा विरुद्ध काँग्रेस या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे. सामनातील रोखठोक या सदरात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला आहे.

“२०१९ नव्हे, २०१४ ला युती तुटली”

अमित शाह यांनी लोकसभेत भाषण करताना २०१९ला शिवसेनेशी युती तुटल्याचा उल्लेख केला. मात्र, युती २०१४ ला पहिल्यांदा तुटल्याची आठवण संजय राऊतांनी आपल्या लेखात भाजपाला करून दिली आहे. “महाराष्ट्र सदनात मोदींनी महाराष्ट्रातील ‘एनडीए’ खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत मोदी म्हणाले, ‘शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली.’ मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे विधान केले. शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ २५ वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शाह कोठेच नव्हते. २०१४ सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तोडली. मोदी २०१९ चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ २०१४ सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली”, असं संजय राऊतांनी लेखात म्हटलं आहे.

“पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे”, असंही यात नमूद केलं आहे.

“हा माणूस मंत्री आहे, या सरकारचा दर्जा…”, नारायण राणेंचा VIDEO शेअर करत प्रियंका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रिया

“मोदींनी दु:ख व्यक्त केलं”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सदनातील आपल्या भाषणात सामना आपल्यावर टीका करतो याचं दु:ख वाटत असल्याचं विधान केलं. त्यावरूनही संजय राऊतांनी टोला लगावला आहे. ‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, ‘आम्ही ‘सामना’ वाचत नाही.’ पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत. हीच खरी लोकशाही”, अशी टिप्पणी राऊतांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: “या देशाची समस्या ही आहे की…”, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!

नारायण राणेंना टोला

दरम्यान, संजय राऊतांनी या लेखातून भाजपा खासदार नारायण राणेंनाही टोला लगावला आहे. “मोदींवर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका ‘सामना’ने केली नाही. भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण. ‘सामना’ने अशी भाषा कधी वापरली नाही”, असंही राऊतांनी नमूद केलं आहे.