शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने,” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं.

खरंतर, काल शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि माध्यमांसमोर दुसरं बोलत असल्याचा आरोप शिंदे यांच्याकडून करण्यात आला होता. याच मुद्द्यावरून आज नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा- “आमदारांचं अपहरण हे…”, संजय राऊतांचा भाजपावर खळबळजनक आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण होणं शक्य नाही, असा खळबळजनक दावा संजय राऊतांकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रसंगातून शिवसेना तावून सुलाखून निघेल. सीतेला एकदाच अग्रिपरीक्षा द्यावी लागली होती. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरं गेली आहे. स्वत: ला शिवसैनिक म्हणवून घेणारे कितीजण निष्ठेच्या अग्निपरीक्षेत पास होतात, हे भविष्यात दिसेल,” असंही राऊत यावेळी म्हणाले.