आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीची बुधवारी (२८ फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर ठाकरे गटातील खासदार आणि मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मविआची आजची बैठक निर्णायक झाली. आजच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दूरध्वनीवरून या बैठकीची माहिती घेत होते. या बैठकीत तिन्ही पक्षांचं जागावाटप सुरळीतपणे पार पडलं आहे. आमच्यात याक्षणी कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचाही प्रस्ताव आला आहे.

संजय राऊत म्हणाले, वंचितच्या प्रस्तावाचा कागद सर्वांना मोठा दिसत असला तरी त्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केलेल्या कामाची माहिती आहे. त्या संपूर्ण कामाची यादी वंचितने दिली आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत. शेवटी आम्हाला सर्वांना या देशात आणि राज्यात लोकशाही आणायची आहे आणि आपलं संविधान टिकवायचं आहे. हाच आमचा आणि वंचितचा मुख्य अजेंडा आहे.

आजच्या बैठकीला मविआचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, अनिल देशमुख आणि वंचितचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम्ही सर्वांनी प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा केली. कोण कुठे जिंकेल यावर चर्चा केली. आमच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे. कोण, किती आणि कोणती जागा लढवतंय ते महत्त्वाचं नाही. चार पक्षांमध्ये ४८ जागांचं वाटप झालं आहे. आमच्याबरोबर इतर लहान पक्षही आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांना वंचितच्या २७ जागेंच्या प्रस्तावावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, वंचितने २७ जागांचा फॉर्म्युला सांगितलेला नाही. त्यांनी केवळ इच्छा व्यक्त केली आहे. आमचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. काँग्रेस महाराष्ट्रासह देशभर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे सर्वांचं ४८ जागांवर लक्ष आहे. त्या ४८ जागा आम्हाला आपसांत वाटून घ्याव्या लागतील. ज्याची जिथे ताकद आहे त्यावर चारही पक्ष चर्चा करत आहोत. कालच्या आणि आजच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांसारखे अनुभवी नेते सहभागी झाले आहेत. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभतंय.