मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे, हे आश्चर्यकारक आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“पक्ष आणि संघटनांचा जन्म महाराष्ट्राविरोधी निर्णय घेण्यासाठीच”

“मुळात राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. मात्र, महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का? हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी पक्षांना बघावं लागेल. खरं तर यावर जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. काही पक्ष आणि संघटना या महाराष्ट्राविरोधी निर्णय घेण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या लाडका भाऊ अन् बहिणीच्या टीकेवरून जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “…

“राज ठाकरेंना या राज्याचा अभ्यास करावा लागेल”

दरम्यान, लाडकी भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र राहिले असते, तर दोन पक्षा फुटले नसते, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या पेक्षा जास्त मजबूत आहे. मी आधीही म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे बराच वेळ परदेशात असल्याने त्यांना राज्यातल्या परिस्थितीची माहिती नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे इतकं मोठं यश मिळवलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनही ९ जागा जिंकल्या आहेत. हे पक्ष टीकल्याचेच लक्षण आहे, खरं तर राज ठाकरेंना या राज्याचा अभ्यास करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकावर टीका

पुढे बोलताना संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवरही टीका केली. “राज्य चालवताना आर्थिक शिस्त असली पाहिजे. तिजोरीत पैसे नसताना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या घोषणा करणं याला आर्थिक शिस्त म्हटली जात नाही. या योजनांसाठी पैसे कुठून आणणार हे राज्य सरकारनं सांगितलेलं नाही. हा एकप्रकारे भ्रष्टाचार आहे ”, असं संजय राऊत म्हणाले.