विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सुद्धा या अभियानासाठी सोमवारी सांयकाळी नागपूरमध्ये दाखल झाले. सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना अनेक राजकीय प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना राऊत यांनी त्यांच्या शैलीमध्येच उत्तरं दिली. यावेळी त्यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूरसंदर्भात दिलेल्या एका सल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी सल्ल्याप्रमाणेच उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.

नेमकं अमृता यांनी काय म्हटलं होतं?
रविवारी भाजपाचे मंत्री गिरिश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांचा विवाहसोहळा जामनेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. राज्यातील अती महत्वाच्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. या लग्नाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. यावेळी अमृता यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला असता नागपूरला गेल्यावर एक गोष्ट आवर्जून करण्याचा सल्ला त्यांनी राऊत यांना दिला होता.

एका पत्रकाराने संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर अमृता यांना प्रश्न विचारला. संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर येतातय, असं म्हणत या पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता यांनी, “नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते,” असं हसत म्हटलं.

संजय राऊतांचं उत्तर
संजय राऊत यांना रविवारी अमृता यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी हसत हसतच, “वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू,” असं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यामुळेच अमृता यांनी नागपूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांना नागपूरची ओळख म्हणून लोकप्रिय असणाऱ्या सावजीची चव चाखण्याचा सल्ला दिलेला. आता त्यावर राऊत यांनीही आपण नक्कीच सावजी खाऊ असं म्हटलंय.