महापालिका निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. मात्र मागील तीन वर्षे निवडणुकीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. ३१ जानेवारी २०२६ च्या पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. तर २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंचा अपमान उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या चाळीस आमदारांना भांगेची रोपटी म्हटलं आहे.तसंच निवडणूक आयोगाला आम्ही रस्त्यावर उतरुन दणका देऊ अशीही भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं साटंलोटं आम्ही उघड केलं आहे. विरोधी पक्षीय शिष्टमंडळातले जे प्रमुख नेते आहेत त्यांची आपसांत चर्चा सुरु आहे की निवडणूक आयोग ज्या दबावाखाली काम करतो आहे त्याबाबत पावलं उचलली पाहिजेत. आम्ही वारंवार भेटी घेत आहोत, निवेदनं देत आहोत, पुरावे देत आहोत. तरीही निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. अशा प्रकारचं एकमत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना दिसतं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही चर्चा झाली. शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, डावे पक्ष यांच्यात चर्चा चालली आहे. निवडणूक आयोगाला सोडणार नाही. घोटाळे करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. ठाणे आणि मुंबईत घोटाळे करुन जिंकायचं आहे हे त्यांचं (महायुती) स्वप्न आहे. त्यांना तुम्हीच जाऊन सांगा की महाराष्ट्र आणि मुंबई आणि ठाण्यातली जनता तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही.

आनंद दिघे तुळशी वृंदावन होते, एकनाथ शिंदे आणि चाळीस चोर भांगेची रोपटी

आनंद दिघेंचा अपमान कुणी केला? आनंद दिघेंचा अपमान गद्दारांनी केला. आनंद दिघे हे निष्ठावान नेते होते. त्यांचा जो निष्ठेचा विचार होता त्यांना तडा देण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला. आनंद दिघे हे तुळशी वृंदावन होतं, त्या वृंदावनात ही भांगेची रोपटी आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोर म्हणजे भांगेची रोपटी आहेत. तुम्ही एक दिवस सत्तेतून बाहेर या आणि आमच्याशी बोला असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे सत्तेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं. तेव्हापासून निवडणूक आली की शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना गद्दार असं संंबोधन उद्धव ठाकरेंनी दिलंं आहेच. आता संजय राऊत यांनी भांगेची रोपटी म्हणत सगळ्यांचा अपमान केला आहे. यावरुन काही प्रत्युत्तर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते देतात का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.