काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. उद्धव ठाकरे आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. या युतीनंतर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही केला जात आहेत. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर प्रकाश आंबेडकर महायुतीचा भाग होणार का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले. ते आज (३१ जानेवारी) ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >> अजित पवार-फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “शरद पवारांनी…”
आंबेडकर हा राजकारणातील ब्रँड आहे
“महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात चौथे चाक लाभले आहे. भाजपाला एकनाथ शिंदे चालत असतील तर मग आम्हाला प्रकाश आंबेडकर का चालणार नाहीत. आंबेडकर हे महाराष्ट्रातील एक मोठी शक्त आहेत. त्याला आम्ही भीमशक्ती म्हणतो. आंबेडकर हा राजकारणातील एक ब्रँड आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना रोज भेटतो, चर्चा करतो. आम्ही दिल्लीतही भेटतो. अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतो. त्यांनी आमचे सल्ले नाही ऐकुदेत. मात्र आम्ही एकत्र आलो आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> ‘संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार’ विरोधकांच्या दाव्यावर बोलताना राऊत भडकले; म्हणाले, “त्यांच्या बापाची…”
केंद्राची आणि राज्याची सत्ता आमच्या पद्धतीने मिळवायची आहे
“महाविकास आघाडीची गाडी व्यवस्थित समोर जाईल. मला वाटत नाही की काही अडचण येईल. तीन पक्ष होते तेव्हा आम्हाला रिक्षा म्हणत होते. आता चौथे चाक आलेले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सरकार एकत्र चालवले. तेव्हा खटके उडाले नाहीत. आता कशाला खटके उडतील. आम्हाला केंद्राची आणि राज्याची सत्ता आमच्या पद्धतीने मिळवायची आहे. त्यामुळे खटके उडायचा प्रश्नच नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>> संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानानंतर शीतल म्हात्रेंचे टीकास्र; म्हणाल्या “राऊत साहेब, लवकर…”
अजित पवार त्यांचं आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील
संजय राऊत यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केले. अजित पवार यांनी कोणाच्या म्हणण्यानुसार पहाटे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हाच प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर म्हणून “शरद पवार यांनी सांगितले आहे, की त्या गोष्टीला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे तो अध्याय आता संपलेला आहे. जेव्हा अजित पवार त्यांचं आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. ही वेळ ते सगळं काही जाहीर करण्याची नाही. शरद पवार यांनी जे काही सांगितलेले आहे, ते पुरेसे आहे. त्या घटनेला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय काढण्यात अर्थ नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले.