अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाल्यानंतर एकीकडे त्यावरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे चालू झालेले असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न जाता सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा-आरती केली. त्यानंतर आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने आमदार अपात्रता प्रकरण, आगामी निवडणुका या सर्वच मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं संजय राऊत यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

“नार्वेकरांनी स्वत:च १० वेळा पक्ष बदललेत”

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे. “राहुल नार्वेकर म्हणाले म्हणून गट होत नाही. स्वत: नार्वेकरांनीच १० वेळा पक्ष बदलले आहेत. त्यांना काय माहिती पक्षाचा आत्मा काय असतो? १०-२० लोक फुटले आहेत. तो गट आहे. त्या गटाला कुणीतरी खोके घेऊन टिळा लावला असेल”, असं राऊत म्हणाले.

“गांधींविषयीचे ते उद्गार बाळासाहेब ठाकरेंविषयीही…”, ठाकरे गटानं मांडली भूमिका; अयोध्या सोहळ्यावर टिप्पणी!

“कोणत्या गटाच्या मागे लोक जात नाहीत. लोक पक्षाच्या, विचारांच्या मागे जातात. राहुल नार्वेकर, निवडणूक आयोगाचे डोमकावळे यांनी काल नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती. शिवसेना ही कागदावर नाहीये, ती रस्त्यावर आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

आरक्षणावर ठाकरे गटाची भूमिका

दरम्यान, नाशिकमधील अधिवेशनामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रस्ताव येणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. “जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा निघाला आहे. शिवसेनेची त्या बाबतीत भूमिका स्पष्ट आहे की मराठा, धनगर यांच्या मागण्या मान्य व्हायला हव्यात. पण इतर कुणाच्याही ताटातलं किंवा वाटीतलं काढून न घेता. तसा ठराव शिवसेनेच्या या अधिवेशनात आम्ही नक्की मांडू”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.