राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यासोबतच करोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी काही निर्बंध आणि नियमावली देखील आयोगाने जाहीर केली आहे. त्यासंदर्भात आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “पूर्ण तयारीनिशीच हा निर्णय घेतला आहे. निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे. आयोगाची खात्री पटली आहे की देशात करोना नष्ट झाला आहे. जाहीर सभांमधून तो वाढणार नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.

दुसऱ्या लाटेवर आरुढ होऊन प्रचार

“निवडणूक आयोगाने जाहीर सभांवर, प्रचारावर, मिरवणुकांवर बंधनं घातली आहेत. ती बंधनं सर्वांसाठी असावीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आम्ही ते पाहिलं आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या लाटेवर आरूढ होऊन कसे प्रचार केले. सत्ताधारी पक्षांनी, पंतप्रधानांनी, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नयेत. पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमाचं पालनं केलं पाहिजे. पंजाबमध्ये जो प्रकार घडला, त्यानंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. लोकांचीही करोनामुळे चिंता वाटते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

निवडणूक आयोगाकडे संधी

आपण निष्पक्ष असल्याची संधी निवडणूक आयोगाकडे असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “निवडणूक आयोग निष्पक्ष आहे, एका पक्षाकडे झुकलेला नाही, तो कुणाच्या दबावाखाली नाही, हे दाखवण्याची त्यांना या निवडणुकांच्या निमित्ताने संधी मिळणार आहे”, असं राऊत म्हणाले.

Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्त टप्पे ही राजकीय पक्षांची सोय

दरम्यान, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका आणि उत्तर प्रदेशमध्ये मात्र ७ टप्प्यात निवडणुका घेतल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करताच संजय राऊतांनी त्यावरून सत्ताधारी भाजपावर अप्रत्यक्ष शब्दांत निशाणा साधला. “ही एखाद्या राजकीय पक्षाची सोय पाहिली जाते. आम्ही पश्चिम बंगालमध्ये हे पाहिलं. तेव्हा करोनाची लाट उसळलेली असतानाही १० टप्प्यांपेक्षा जास्त टप्प्यांत निवडणूक घेतली गेली. ते योग्य नव्हतं. काही सत्ताधारी प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी या तडजोडी असतात”, असं राऊत म्हणाले.