अलीकडे विरोधी पक्षांची ईव्हीएम संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमबद्दल असलेल्या शंकांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. विरोधकांच्या या आक्षेपांवर सत्ताधारी नेत्यांकडून टीका होती आहे. पण, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी ईव्हीएम मशीनवर विश्वास असल्याचे म्हटलं आहे. “ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत,” असे अजित पवारांनी सांगितलं. या वक्तव्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकमत नसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : “भाजपाची स्क्रिप्ट शरद पवार वाचतात का?”, मनसे नेत्याच्या विधानावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही,” असा टोला संजय राऊतांनी लगावाला आहे.
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला आहे. “एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकारी नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारले पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले.”
हेही वाचा : शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले…
“बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.