scorecardresearch

एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; युतीचा उल्लेख करत म्हणाले, “ते लवकरच…”

एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर भेटीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; युतीचा उल्लेख करत म्हणाले, “ते लवकरच…”
संजय शिरसाट संग्रहित छायाचित्र

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत जास्त न ताणता भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणाले.

काय म्हणाले संजय शिरसाठ?

“राजकारणात भूमिका मागे पुढे करावी लागते. त्याशिवाय प्रकाश आबेडकरांची कोणाशी युती होईल, असे वाटत नाही. एकनाथ शिंदेबाबत त्यांचे मत त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत जास्त न ताणता योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करावी. आगामी महापालिकास, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा मेसेज त्यांना देता येईल. याबाबत ते लवकरच भूमिका जाहीर करतील”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

राऊतांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर

पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा डावोस दौरा आणि पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली होती. याबाबत बोलताना, ते म्हणाले, “मी मागेही अनेकदा सांगितलं की संजय राऊत यांना आता उपचाराची गरज आहे. गेल्यावेळी ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डावोसला जाऊन बर्फ खेळणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एका चांगल्या कामाला जात असेल तर त्याच्यावर टीका करायची, हा त्यांचा स्वभाव आहे. १९ तारखेला पंतप्रधान येणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. अडीच वर्षात जी कामं थांबली होती. ती आता मार्गा लागणार आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे.”

“आदित्य ठाकरेंना काहीही माहित नाही”

यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्राबाबतही प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहीत सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या उद्घाटनाला सहा महिने उशीर का केला? असा प्रश्न विचारला होता. याबाबत बोलताना, “आदित्य ठाकरेंना काहीही माहिती नाही. असे अनेक प्रकल्प आहेत. ज्याचे उद्घाटन आधीच्या काळात झाली आणि लोकार्पण पुढच्या सरकारमध्ये झाले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या