सोलापूर : संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजाचा दिंडी पालखी सोहळा रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याची शीव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात, करमाळा तालुक्यातील रायगाव येथे दाखल झाला. हजारो भाविकांनी भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. हलग्यांचा कडकडाट, अबीर गुलालाची मुक्त उधळण, पुष्प वर्षाव अशा जल्लोषमय वातावरणात रायगावी भक्तीचा मळा फुलला होता.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ पालखीचे करमाळा तालुक्याच्या सीमेवर आगमन होताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने आदींनी पालखीचे स्वागत केले. यावेळी करमाळ्याच्या प्रसिद्ध हलगी पथकाने हलगी वाजवून कडकडाट केला तेव्हा अनेकांचे पाय अक्षरशः थिरकले. यातच अबीर गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.
जेसीबी यंत्राच्या साह्याने संत निवृत्तीनाथांच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात पुष्पवर्षाव करण्यात आला. निवृत्तीनाथांचा पालखी रथाला जोडलेल्या बैलांची जोडीही अबीर-गुलालासह पुष्पवृष्टीत न्हाऊन निघाली होती.
या पालखी सोहळ्यात सुमारे ५० हजार वारकरी सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग, भजनाचे गायन, विठ्ठल-रखुमाईचा गजर, डोईवर तुळशी घेऊन भक्तिभावाने तल्लीन झालेल्या महिला, त्यांचे फेर धरून नाचणे, त्यातच वारकऱ्यांचा फुगड्यांचा खेळ अशा वातावरणात आनंदाला भरती आली होती.
रायगाव भागात संत निवृत्तीनाथांच्या आगमनाची चाहूल लागताच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी स्वागताची तयारी केली होती. ‘संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’असा उत्साह आणि भक्तिभाव संपूर्ण गावात दिसत होता.