Santosh Deshmukh Murder Case Anjali Damania : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. घुले हा बीडमधील गुंडांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती सीआयडीने न्यायालयात दिली आहे. याच टोळीने संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड देखील याच टोळीचा सदस्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधी सुदर्शन घुले व विष्णू चाटेसह एकूण आठ जण आरोपी होते. त्या सर्वांवर मकोका लावण्यात आला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याचादेखील या हत्याकांड प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केलं. मस्साजोगचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, तर संतोष देशमुखांच्या भावाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.

मस्साजोग व बीडमधील आंदोलनांनंतर पोलिसांनी हत्येच्या कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मकोका लावला. कराडनेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याच्यावर मकोका लावल्यानंतर या प्रकरणी मकोका लावलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे. तसेच सीआयडीचे अधिकारी देखील बदलण्यात आले आहेत.

सुदर्शन घुलेवर आठ गुन्हे?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एका बाजूला चालू आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांमधील नेते, आमदार व सामाजिक कार्यकर्ते देखील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले व विष्णू चाटे या गुन्हेगारांविरोधात आक्रमक झाले आहेत. या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी आवाज उठवत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील कराड, चाटे व घुलेविरोधातील त्यांच्याकडील माहिती समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. दमानिया यांनी सोमवारी (२० जानेवारी) सुदर्शन घुलेविषयीची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. दमानिया यांनी दावा केला आहे की सुदर्शन घुलेवर वेगवेगळ्या प्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसांनी एकूण ४९ कलमं लावली आहे. मात्र आजवर तो मोकाट फिरत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की सुदर्शन घुले याच्यावर आठ गुन्हे दाखल असून त्याच्यावर ४९ कलमं देखील लावण्यात आली आहेत. मी आज त्याच्यावरील प्रत्येक गुन्ह्याची व कलमांची माहिती, त्याचा अर्थ समाजमाध्यमांवर लिहिणार होते? परंतु, आपण किती लिहिणार? आपण कलमं लिहून थकतो, मात्र हे गुन्हेगार गुन्हे करून थकत नाहीत. हे इतके सराईत गुन्हेगार आहेत आणि ते पण मोकाट.