सांगली : शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी निधी सत्वर मिळावा या मागणीसाठी सोमवारी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरपंचांचा इस्लामपूरमध्ये बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, शहराध्यक्ष शहाजी पाटील आदींसह विविध गावांतील सरपंच या मोर्चात सहभागी झाले होते.
इस्लामपूर येथील तहसील कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैलगाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली. गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, झरी नाका मार्गे पंचायत समितीमध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजप आ. बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकऱ्यांनी चांगला समाचार घेतला.
आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्यावतीने पंचायत समितीमध्ये सहायक गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.