सातारा : आषाढी वारीच्या काळात सातारा जिल्ह्यातील अकरा आगारातून विशेष यात्रा गाड्यांचे नियोजन केले होते. जिल्ह्यातून २५६ बसद्वारे १३७७ फेऱ्या करण्यात आल्या. एक लाख १३ हजार ८७९ वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडविले. त्यातून एक कोटी ३२ लाख ४२ हजार २७० रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला.
पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यनिमित्त महामंडळाच्या सातारा विभागाने ज्यादा बसेसचे नियोजन केले होते. दि. २ ते १३ जुलैअखेर सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, मेढा, दहिवडी, वडूज या ११ आगारांतून भाविक व वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या. तसेच पंढरपूर येथून थेट गावी जाण्यासाठी ४० पेक्षा जास्त वारकऱ्यांनी एकत्रित मागणी केली होती. त्यानुसार दहा ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या. या उल्लेखनीय सेवेमुळे हजर वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असल्याची माहिती विभाग नियंत्रक विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून जात असतो. यावर्षीही लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्काम करून वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे गेला. या काळातही पालखी मार्गावर ज्येष्ठ नागरिक, महिलांना पुढील मुक्कामाच्या ठिकाणी जाता यावे. यासाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. या दिवसात एसटीचे अधिकारी, कर्मचारी संबंधित ठिकाणी तळ ठोकून होते. विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांचा देव मानून फलटण बसस्थानकात मुक्कामाच्या दिवशी जेवण देण्याचे नियोजन केले होते. ही पद्धत महामंडळाने यंदाही पाळली. खंडाळा बसस्थानक व फलटण बसस्थानकात जेवणाची सोय केली होती.