सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रातील झाडानी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन खरेदीप्रकरणी येत्या २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, संगीता चंद्रकांत वळवी, अरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रातील झाडानी येथील ६२० एकर जमीन वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी खरेदी केली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील संवेदनशील भागात झालेल्या प्रचंड मोठ्या जमीन खरेदी व्यवहाराची मोठी चर्चा घडली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर या प्रकरणाची चौकशी होत कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत पुढील कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांपुढे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या अंतर्गतच आता पुढील सुनावणी येत्या २६ नोव्हेंबर रोजी होत आहे.
झाडानी (ता. महाबळेश्वर) येथील या जमीन खरेदी व्यवहारामध्ये कमाल जमीन धारणा मर्यादेपेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला होता. यासाठी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष डोंगरवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना नोटिसा काढून कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे यांच्याकडे साताऱ्यासह रायगड, पुणे, नंदुरबार जिल्ह्यात जमीन असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले होते.
रायगड, पुणे, नंदुरबार हे दुसऱ्या महसूल विभागात येत असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हास्तरावर घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे शासन नियमानुसार याबाबत काय कार्यवाही करावी, याचा प्रस्ताव शासनाकडे अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे पाठवला होता.
त्यांनी रायगड येथील चंद्रकांत वळवी, नंदुरबार येथील अनिल वसावे व पुणे येथील पीयूष बोंगीरवार यांची जमीन असल्याने तेथील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली होती. याचा संकलित अहवाल मंत्रालयात महसूल व वन विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटींसह अहवाल सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील सुनावणीसाठी आला आहे.
ही सुनावणी आता बुधवार, दि. २६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सुनावणीसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, संगीता चंद्रकांत वळवी, अरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
