सातारा : सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुकांचे आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात २५५ नगरसेवकांचे भवितव्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नऊ पालिका आणि एक नगरपंचायतीत १५५ प्रभागांतील २३३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार एक लाख ९१ हजार ४६४ व महिला मतदार एक लाख २४ हजार ७३४ इतके आहेत. या तपशीलाची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. यावेळी पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त अभिजीत बापट, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होत्या.
संतोष पाटील पुढे म्हणाले, उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० ते १७ नोव्हेंबर यादरम्यान राबवण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १८ रोजी सकाळी अकरापासून होणार आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दि. १९ ते २१ दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात अपील असल्यास दिनांक २१ ते २५ या दरम्यान जाहीर करण्यात येईल.
निवडणूक चिन्ह नेमून अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि २ डिसेंबर रोजी मतदान व दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजपत्रांमध्ये दिनांक १० डिसेंबर रोजी या निकालाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकांसाठी एकूण ४३७ मतदान केंद्र असून, यामधून तीन लाख ८६ हजार ४५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इतर ५९ मतदार आहेत. मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या एक लाख ९४ हजार ७३२, पुरुष मतदारांची संख्या एक लाख ९२ हजार ४६४ इतकी आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील. मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी २४ तास म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजता प्रचार बंद होईल व त्याच दिवशी रात्री दहा वाजता ध्वनीक्षेपकांचा आवाज बंद होणार आहे. मतदारांसाठी Mahasecvoter list.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. यामध्ये सर्च नेम इन्व्हर्टर लिस्ट यावर क्लिक करून नाव किंवा एपिक क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येणार आहे. जिल्ह्यात ४३७ मतदान केंद्रांवर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ५३२ कंट्रोल युनिट १ हजार ७४ बॅलेट युनिटची उपलब्धता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अ वर्ग पालिकेसाठी नगराध्यक्षांना १५ लाख तर उमेदवारांना पाच लाख रुपये खर्चाची, ब वर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्षांना ११ लाख २५ हजार तर नगरसेवकांना साडेतीन लाख, ‘क’ प्रवर्ग नगरपालिकांसाठी नगराध्यक्षांना साडेसात लाख व नगरसेवकांना अडीच लाख, नगरपंचायत क्षेत्रासाठी नगराध्यक्षांना सहा लाख रुपये व नगरसेवकांना सव्वादोन लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
याच प्रमाणे आज वाई येथे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. कराड, फलटण, म्हसवड, मेढा येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.
