सातारा : सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे सातारकरांनी उस्फूर्त स्वागत केले आहे.या हल्ल्याची माहिती मिळताच सकाळी फटाके फोडून भारताच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, वाई, फलटण, म्हसवडमध्ये महायुतीकडून जल्लोष करण्यात आला.पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर सरकारने द्यावे, अशी जनसामान्यांची भावना होती. गेले १० दिवस भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर दिले जाणार याची खात्री वाटत असतानाच मध्यरात्री पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्य दलाने अतिरेकी प्रशिक्षण तळ उद्ध्व स्त केले. सैन्य दलाच्या या कृतीचे जोरदार स्वागत आज करण्यात आले.
ही बातमी येताच नागरिक सकाळीच रस्त्यावर आले. त्यांनी भारताच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. या वेळी काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांसह भारताचा जयजयकार करण्यात आला. अनेक ठिकाणी भारतीय जवानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. जल्लोषासोबतच साखर, पेढेवाटप करण्यात आले. काही शहरांमध्ये दुचाकीवरून तरुणांनी घोषणा देत फेरी काढली. माजी सैनिकांनी व त्यांच्या नातेवाइकांनी या हल्ल्याचा मोठा जल्लोष केला. सैनिकांचे गाव मिलिटरी अपशिंगे (ता. सातारा) येथे निवृत्त सैनिकांनी आनंद व्यक्त केला.