सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने आज सकाळी ‘सज्जनगड रन २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात हिरवाईने नटलेल्या गडावर पळताना स्पर्धक सुखावत होते.

या समर्थ दौडीचा शुभारंभ भर पावसात आणि उत्साही स्पर्धकांच्या जय भवानी जय शिवाजी, जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात ज्येष्ठ अभिनेते व निसर्गप्रेमी छायाचित्रकार मिलिंद गुणाजी व योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते झाला. श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्यांचा मंत्र द्यावा, यासाठी ही सज्जनगड रन आयोजित करण्यात आली होती.

साताऱ्यात भर पावसात पार पडलेल्या सज्जनगड रनमध्ये शेकडो धावपटूंनी भाग घेतला.

अतिशय चढाचा हा धावमार्ग १८ वर्षांवरील पुरुष व महिलांसाठी पाच व ११ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात होता. समाजात शारीरिक, आरोग्य आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असून, ज्यामुळे शरीर आणि मन या दोघांनाही पोषण देणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्याची ही संधी आहे, अशी माहिती योगेशबुवा रामदासी यांनी दिली. अशा प्रकारचा हा अनोखा उपक्रम श्री समर्थ सेवा मंडळाने दर वर्षी ठेवावा. त्याला धावपटू निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करतील, असे मत या वेळी मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले.

समर्थ दौडीच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य म्हणून सातारा येथील डॉ. अजिंक्य दिवेकर, त्यांचे सर्व कर्मचारी डॉक्टर व प्रतिनिधींनी या दौडीतील आरोग्य सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी कार्याध्यक्ष डाॅ. अच्युत गोडबोले, कार्यवाह समर्थभक्त योगेशबुवा रामदासी, प्रवीण कुलकर्णीगुरुजी, समर्थभक्त विद्याधरबुवा वैशंपायन, आमोद ताम्हणकर, गजाननराव बोबडे, तसेच समर्थ मंडळाचे सहकारी संतोष वाघ, उत्तम तारळेकर व सज्जनगडावरील रामदासी मंडळी उपस्थित होती.

स्पर्धेपूर्वी सर्व स्पर्धकांनी समर्थ रामदासस्वामींच्या नावाचा जयजयकार करत मनाचे श्लोक म्हणत ही अनोखी सज्जनगड रन सुरू केली. हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या सज्जनगडच्या अतिशय चढण असलेल्या रस्त्यावरूनही हे धावपटू अतिशय लीलया धावत हे अंतर कापत होते. स्पर्धेतील अंतिम टप्पा म्हणजे सुमारे दीडशे पायऱ्यांची चढण पूर्ण करत हे सर्व धावपटू समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचले. सर्व धावपटूंचा रामनामी प्रसाद, तसेच पुष्पगुच्छ देऊन समर्थभक्त योगेश रामदासी यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना प्रशस्तिपत्रक, राम वस्त्र आणि सहभागाबद्दल अल्पोपाहार देण्यात आला.