सातारा : शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर असून, या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्ज्वल पिढी घडवीत असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करून मोठे व्हावे आणि देशाचा, तसेच राज्याचा लौकिक वाढवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.कोडोली (ता. सातारा) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन श्री. शिंदे यांनी केले. या वेळी आमदार महेश शिंदे, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थी उच्च पदावर काम करीत आहेत. अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांनी शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शासनाचा भर आनंददायी शिक्षणावर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात आमूलाग्र बदल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे भाषण झाले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साताऱ्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.दरम्यान, कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.