सातारा : साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्तपदी बदली झाली आहे. तेथील उपायुक्त तुषार दोशी यांना साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले.

दोशी यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. ते २००१ मध्ये सेवेत आले. नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथील राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले. चंद्रपूर, गडचिरोली व राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागाचे त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये काम केले आहे. दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना दोशी यांनी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरण अतिशय कुशलतेने हाताळले होते.

प्रशिक्षणासाठी गेलेल्या समीर शेख यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये गडचिरोली येथून साताऱ्यात बदली झाली होती. त्यांनी येथे आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हलवून त्यांनी आपल्या जिल्ह्यातील कामाला सुरुवात केली. कारकिर्दीमध्ये ४० टोळ्यांमधील सुमारे १७६ जणांना त्यांनी मोका लावला. प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बिमोड त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते.