कराड : तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत सूर्यप्रभा फार्माकेम या खत कंपनीत १ किलो २७० ग्रॅम वजनाचे सहा कोटी ३५ लाख रुपयांचे मादक पदार्थ असलेल कोकेन सापडल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तीन जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी, मलकापूर- कराड), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवर्डे, ता. पाटण) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. तर पसार झालेल्या विश्वनाथ शिफनकर (रा. दौंड, जि. पुणे) याचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव, ता. सातारा) याला तेलंगणा राज्यातील श्रीरामपूर पोलिसांनी तेथील अमली पदार्थ प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे.सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीचे मालक असलेले अमरसिंह देशमुख याला तेलंगणा राज्यातील श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तासवडेतील सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीत कोकेन मिळाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कंपनीत छापा टाकला. या छाप्यात कोकेनचा साठा आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील तीन जणांना अटक केली आहे. तर, पसार असलेल्या विश्वनाथ शिफनकरचा कसून शोध जारी आहे. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले हे तपास करीत आहेत.