सातारा: महाराणी जमनाबाई गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत गौरवशाली इतिहास निर्माण केला. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे, यासाठी रहिमतपूरनगरीत महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे स्मारक लवकरच उभे करण्यात येईल असे आश्वासन आशिष शेलार यांनी दिले. तसेच सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही आता महिलांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक बनली आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व महिलांचा सन्मान करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने – कदम आणि ‘दोन तास समाजासाठी महिला ग्रुप’ यांच्यावतीने रहिमतपूर येथे आयोजित ‘महिला कौतुक सोहळ्यात’ शेलार बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, चित्रलेखा माने – कदम, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह जाधवराव, सुरभीताई भोसले, प्रियंका कदम यासह मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांची काळजी घेणारे व त्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणारे नेतृत्व आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सक्षम केले आहे. महिलांना विविध अधिकार दिले आहेत. असे सांगून शेलार म्हणाले की, विरोधक ‘लाडकी बहीण योजना’ बंद पडणार, असा अपप्रचार करीत आहेत. पण मी वचन देतो, ही योजना बंद पडणार नाही. तर उलट यामध्ये अधिक वाढ होईल. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.
चित्रलेखाताई माने -कदम वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. महिलांचे उत्तम संघटन त्यांनी केले आहे. हा अनोखा उपक्रम महिला शक्तीला बळकटी देणारा आहे.
यावेळी आ. डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सुनेषा शहा, दैवशीला मोहिते, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, वैशाली मांढरे, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, विविध संस्थांचे पदाधिकारी, तेजस्विनी महिला मंडळ पदाधिकारी, सदस्या, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.