सातारा : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सातारकरांना आतुरता लागली आहे. गुरुवारी (दि. २६) पालखीचे जिल्ह्यात लोणंद येथे आगमन होत आहे. पालखीच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे. वारकरी व भाविकांना पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता आदी सोईंची पूर्तता युद्धपातळीवर करण्यात आली आहे.
वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात चार दिवस विसावणार आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारण्यात आले आहेत. हे मंडप वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण आणि आरामदायी मुक्काम यासाठी उभारण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेने त्यासाठी विशेष तयारी केली आहे.जिल्ह्यात आल्यानंतर परंपरेप्रमाणे निरा नदीत स्नान झाल्यानंतर हा सोहळा लोणंद येथे विसावणार आहे. शुक्रवारी (दि. २७) या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा निंब तरडगाव येथे दुपारी होणार आहे. तरडगाव, शनिवारी (दि. २८) फलटण येथील मुक्कामानंतर रविवारी (दि. २९) बरड येथे मुक्कामी विसावणार आहे. सोमवारी (३० जून) सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
पालखी सोहळ्यासाठी दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. बंदोबस्ताकरिता १२१ पोलीस अधिकारी, ९०७ पोलीस अंमलदार, १००० होमगार्ड, एक एसआरपी कंपनी व दोन आरसीपी पथके नेमण्यात आली आहेत.पालखीतळावर दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २०० बॅरिकेड्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. तब्बल १८०० निर्मलवारी शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वैद्यकीय पथके आणि तात्पुरते दवाखाने, विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
पालखीतळ येथे हिरकणी कक्ष उभारला आहे. तरडगाव येथे उभ्या रिंगणाची तयारी झाली आहे. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड पालखीतळ येथे ठिकठिकाणी सुरक्षेसाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सोहळ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांची नेमणूक करण्यात आली आहे.