कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील चांगलेच सक्रिय झाले आहेत. माजी नगरसेवक काँग्रेसला सोडून गेले असले, तरी त्याचा शहरातील काँग्रेसवर फरक पडणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पक्ष मेळाव्यात काँग्रेसचा महापौर करण्याचा इरादा व्यक्त केला. जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार असताना ते शून्यावर आणण्याचे विधान त्यांनी केले असले, तरी जिल्ह्यातील काँग्रेसची एकूण अवस्था पाहता ते आव्हानात्मक असणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती महाराज विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. या निवडणुकीत विशेषतः कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवारीचे घडलेले नाट्य चक्रावून टाकणारे होते. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. अर्थात तो केवळ कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर परिणाम करणारा तर होताच, पण संपूर्ण जिल्ह्यालाच हादरवून टाकणारा होता. महायुतीने सर्व १० जागांवर विजय मिळवताना काँग्रेससह महाविकास आघाडीला धोबीपछाड दिले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना एकनाथ शिंदे शिवसेनेने सतेज पाटील यांचे महापालिकेतील कारभारी म्हणून ओळखले जाणारे स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काही माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. हा आमदार पाटील यांना राजकीय धक्का मानला जातो. या घटनेचा कोल्हापुरातील काँग्रेस बांधणीवर काहीच परिणाम होणार नसल्याचे सतेज पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपली ही भूमिका काँग्रेसच्या मेळाव्यात परखडपणे बोलून दाखवली. जे गेले आहेत त्यांनी निर्णय घेतला आहे. अजूनही नाराज आहेत त्यांनीही निर्णय घ्यावा. शेवटच्या क्षणी साथ सोडण्याच्या निर्णय घेतील ते माझे लक्ष्य असतील, असे म्हणत त्यांनी आपला आक्रमक बाणा दाखवून द्यायला सुरुवात केली आहे.

कोल्हापुरात काँग्रेसला उभारी

कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातच काँग्रेसची पडझड झाली असल्याने हा बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. अशा स्थितीत सतेज पाटील यांच्यासारखे नेतृत्व हाच काय तो काँग्रेसला आधार ठरला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते ते विरोधी पक्षाचे नेते अशी त्यांची वाटचाल सुरू असताना कोल्हापुरात पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेद जागवताना त्यांनी पदाधिकारी निवडीमध्ये स्थान देण्याची संधी बोलून दाखवली आहे. खासदार शाहू महाराज यांनीही कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस भवनात किती?

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आता माझा मुक्काम प्रभागातच असेल, असे म्हणत सतेज पाटील यांनी आतापासूनच निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या राजकारणात गेली दोन दशके आमदार पाटील यांचा निर्विवाद प्रभाव राहिला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजवर महापौर, इतर पदाधिकारी निवडले गेले आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर एक गल्ली सोडून पलीकडे असलेल्या अजिंक्यतारा या जनसंपर्क कार्यालयात नेहमी असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा काँग्रेस भवनातील वावर कमी झाला आहे. खासदार शाहू महाराज हे तर केवळ कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थिती लावतात, असे स्पष्ट झाले. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा रोवायचा असेल, तर काँग्रेस भवनातून पक्षबांधणी करण्यावर भर देण्याची गरज कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे.