सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील कोलझर आणि परिसरामध्ये हत्तींच्या उपद्रवाने कहर केला असून, काल शुक्रवारी रात्री हत्तींनी कोलझरमध्ये एका नारळ बागायतीचे मोठे नुकसान केले. या गंभीर परिस्थितीत हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात असलेले वनविभागाचे पथक गस्तीवर असताना झोपले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून हत्ती तळकट आणि कोलझर परिसरात धुमाकूळ घालत आहेत. दिवसा दोन्ही गावांच्या सीमेवर वास्तव्य करणारे हे हत्ती सायंकाळ होताच खाली उतरून बागायती तुडवत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पथक नेमले आहे आणि शासनाकडून यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे पथक पूर्णपणे निष्क्रीय ठरत आहे. ड्रोनच्या माध्यमातून हत्तींचे अचूक स्थान (लोकेशन) कळत असूनही, हे पथक केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने स्थानिक नागरिक हतबल झाले आहेत.

वनविभागाच्या या पथकाच्या निष्काळजीपणाचा कळस काल रात्री झाला. हत्ती रात्रभर बागायतीमध्ये धुमाकूळ घालत असताना, ड्रोन ऑपरेटर वगळता पथकातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित नव्हते.काल शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता हत्तींचा कळप कोलझरमधील मधलीवाडी येथील रस्त्याच्या वरच्या भागात पोहोचला. तेथे शिवप्रसाद देसाई यांच्या मालकीच्या नारळ बागेत घुसून त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यास सुरुवात केली.

ड्रोनमध्ये हत्तींचे लोकेशन कोलझर दिसत असताना, वनविभागाचे एक पथक तळकटमध्ये कार्यरत होते. हत्ती असलेल्या ठिकाणी वनकर्मचारी उपस्थित होते, परंतु त्यांच्याकडे हत्तींना हुसकावण्यासाठी पुरेसे फटाके उपलब्ध नव्हते. त्यामुळे मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिकांनी वनकर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यानंतर तळकटमधील पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी फटाके वाजवताच हत्ती डोंगराच्या दिशेने निघून गेले. ड्रोन ऑपरेटर हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता, मात्र यानंतर गस्तीवर असलेले वनपथक हत्तींचा माग सोडून गायब झाले.

मध्यरात्रीनंतर हाच कळप पुन्हा कोलझर मधलीवाडीत दाखल झाला आणि थेट वस्तीच्या दिशेने, तेथील बोर्डिंग परिसरात पोहोचला. स्थानिकांना हत्तींच्या आगमनाची चाहूल लागताच एकच धावपळ झाली. काही वेळातच या कळपाने पुन्हा श्री. देसाई यांच्या बागेकडे मोर्चा वळवला आणि नारळबाग उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. तळकट आणि कोलझरमधील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले, परंतु आक्रमक झालेल्या हत्तींच्या समोर जाण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. यावेळी वनविभागाचे कर्मचारी पूर्णपणे गायब होते. हत्तींनी पहाटेपर्यंत बागेतील नारळाची लागायला आलेली अनेक झाडे अक्षरशः जमीनदोस्त केली.

वन पथक झोपले;अशीही गस्त!

हत्तींना नुकसानापासून वाचवण्यासाठी वनविभागाची टीम घटनास्थळी तैनात असते. ड्रोनमुळे हत्तींचे अचूक लोकेशन मिळत असले, तरी हे पथक केवळ हत्तींना पाहण्यापलीकडे काहीच कारवाई करत नाही. काल मध्यरात्रीनंतर कोलझर मधलीवाडी येथे हत्ती धुमाकूळ घालत असताना हे पथक गायब होते. स्थानिकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, काही कर्मचारी गावातच एका अंगणात चक्क झोपलेले आढळले. त्यांच्या निष्काळजीपणाचे छायाचित्र काढून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फटाके लावले तर हत्ती बिथरतात!

“हत्तींना थोपवण्यासाठी गस्तीपथक तैनात आहे. फटाके लावल्यास हत्ती अधिक बिथरतात, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फटाक्यांचा विचारपूर्वक वापर करण्याबाबत पथकातील कर्मचाऱ्यांंना सूचना दिल्या आहेत. त्यांना नुकसान टाळण्यासाठी सतत सतर्क राहण्यासही सांगितले आहे. काल कर्मचारी हत्ती उपद्रव करत असताना घटनास्थळी गैरहजर राहिल्याच्या प्रकाराची आम्ही चौकशी करून माहिती घेऊ.” – वैशाली मंडल, वन क्षेत्रपाल, दोडामार्ग