​Ganeshotsav 2025 : सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील ‘माळीचे घर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राऊळ कुटुंबियांच्या सातशे वर्षांची परंपरा असलेल्या गणपती बाप्पाला सातव्या दिवशी उत्साहात निरोप देण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या भव्य गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला.

​जवळपास ८५ पेक्षा जास्त कुटुंबांचा हा गणपती असून, माळगाव गावातील पाचवे देवस्थान म्हणूनही या गणपतीची ख्याती आहे. यावर्षीही सात दिवसांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशपूजन, ऋषिपंचमी, गौरी विसर्जन, सत्यनारायण महापूजा, भजन आणि फुगड्या अशा अनेक कार्यक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढवली.

​हा गणेशोत्सव राऊळ कुटुंबाच्या एकतेचे एक आदर्श उदाहरण आहे. दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आरत्यांमध्ये घरातील सर्वजण एकत्र येऊन गणेशाची आराधना करतात. मूर्ती स्थापनेच्या दिवशी गणेशाला सात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि सामूहिक भोजनाचाही आनंद घेतला जातो. या सात दिवसांमध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

​विसर्जनाच्या दिवशी चोवीस जणांच्या मदतीने ढोल-ताशांच्या गजरात गणपतीला निरोप देण्यात आला. ही मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. विसर्जन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सामूहिक भोजन घेतले आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याच्या आशेने आपापल्या कामाला लागले. ​या उत्सवामध्ये गावातील स्थानिक रहिवासी, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि अनेक भाविकांनी गणपतीचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी बाप्पाला साकडे घातले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वाजतगाजत मिरवणूकीत करण्यात आले.