सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या जमीन घोटाळ्यांवर आणि अवैध उत्खननांवर अंकुश ठेवण्यासाठी गेल्या १५ वर्षांत जिल्ह्यात झालेल्या सर्व जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे. महसूल प्रशासन या गैरप्रकारांमध्ये बळी का पडते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

​सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत बोलताना पारकर म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा तर्फे साटेली आणि वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे खोटी कागदपत्रे वापरून मोठ्या प्रमाणात अवैध मायनिंग सुरू आहे. या प्रकरणामागे नेमका कोण ‘आक्का’ (मुख्य सूत्रधार) आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या अवैध उत्खननाविरोधात गणेश चतुर्थीनंतर स्थानिक जनतेला सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

​पारकर यांनी महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हे गैरप्रकार रोखण्याची आणि चौकशी करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

​महसूलमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत, पण कारवाईची अपेक्षा

​महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यामध्ये वाळू माफिया आणि अवैध उत्खननाची चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका मांडली आहे. पारकर यांनी या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले की, जर बावनकुळे यांनी खऱ्या अर्थाने ही भूमिका प्रत्यक्षात उतरवली, तर जिल्हावासियांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल.

​पारकर यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाकडे आणि थेट महसूलमंत्र्यांकडे अनेक पत्रव्यवहार केले असल्याचा दावा केला. सासोली येथील जमीन घोटाळ्याबाबत अनेक आंदोलने केली, तरीही असे प्रकार थांबलेले नाहीत. पारकर यांनी जानेवारी महिन्यात सासोली जमीन खरेदी-विक्री प्रकरणाबाबत महसूलमंत्र्यांना निवेदन दिले होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नोंद घेण्यास सांगितले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यांनी स्वतः लेखी तक्रार दाखल केली असूनही, ‘आमच्याकडे तक्रारच नाही’ असे महसूलमंत्री म्हणत असतील तर ते योग्य नाही, असेही पारकर म्हणाले. ​

ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी अशा गैरप्रकारांमध्ये बळी न पडता, आपले कर्तव्य कायद्यानुसार पार पाडावे. जर महसूल विभागाच्या विरोधात बावनकुळे यांनी घेतलेली भूमिका प्रत्यक्षात दिसली, तर जिल्ह्याला दिलासा मिळेल.