सावंतवाडी: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या एका कुटुंबाने स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी तिलारी धरणाजवळ आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आयोनडे येथील धरणग्रस्त सदाशिव महादेव सावंत यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत हा टोकाचा निर्णय घेतला आहे. तिलारी प्रकल्पासाठी त्यांची जमीन आणि घर गेलं होतं, त्यानंतर त्यांना साटेली भेडशी येथे पर्यायी शेतजमीन देण्यात आली. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून त्यांना या जमिनीपर्यंत जाण्यासाठी संबंधित मूळ जमीनधारक विरोध करत आहेत. या समस्येसाठी त्यांनी अनेकदा उपोषणं केली आणि जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला, पण प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला गेला नाही.
सावंत यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जर शासनाने जमीन संपादित केली असेल, तर मूळ मालक विरोध का करत आहेत?” जर ही अडचण दूर होत नसेल, तर दुसरी पर्यायी जमीन द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. इतर प्रकरणं लगेच मार्गी लावली जातात, पण धरणग्रस्तांच्या बाबतीत उदासीनता दाखवली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळेच त्यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा कठोर निर्णय घेतल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
सदाशिव सावंत यांच्याप्रमाणेच अनेक धरणग्रस्तांना अशाच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांना असे टोकाचे निर्णय घेण्याची वेळ येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.