संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या पाश्वभूमीवर राज्यातील तसेच मुंबईतील करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी करोना संरक्षण विषयक सर्व नियम दिवाळीत लोकांनी धाब्यावर बसल्याने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपल्याला करावाच लागेल अशी साधार भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. युरोपमधील अनेक देश करोना विषयक सुरक्षेच्या सर्व सूचना पायदळी तुडवल्याचे परिणाम भोगत आहेत.

बहुतेक युरोपीयन देशात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करावी लागली आहे. अनेक देशांनी शाळा तसेच धार्मिक स्थळे बेमुदत काळासाठी बंद केली आहेत. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीत उद्भवली असून दिल्लीत करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रात मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा तसेच स्वच्छतेचे सर्व नियम पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा वारंवार करत होती. मात्र ग्रामीण तसेच शहरी भागात कोठेही लोकांनी काळजी घेतली नाही. बहुतेक सर्व ठिकाणी लोक मास्क शिवाय फिरत असून काही शहरी भागात कारवाईच्या भीतीपोटी तोंडावर मास्क लावलेले दिसले.

हॉटेल – रेस्टॉरंट वा सार्वजनिक ठिकाणी अगदी बागेमध्येही लोक बिनधास्तपणे मास्क न लावता फिरत आहेत. दिवाळीच्या काळात बहुतेक बाजारपेठेत सुरक्षित अंतर व मास्कचा नियम लोकांनी ठरवून धाब्यावर बसवलेले दिसत होते. “लोकांनीच जर निखाऱ्यावरून चालायचे असे ठरवले असेल तर त्याला कोण काय करणार,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राज्याचे माजी आरोग्य महासंचालक आणि करोना विषयक राज्याचे प्रमुख सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केली. पुणे व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण सर्वाधिक होते. मात्र या भागात आता लोक जास्तीतजास्त बेपर्वा झाल्याचे पाहायला मिळते. पुण्यातील सारस बागेत जत्रा उसळल्याने महापालिकेला बाग बंद करावी लागल्याचे सांगून लोकांच्या बेपर्वा वृत्तीमुळे करोनाची दुसरी लाट अटळ असल्याचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

“काही राजकीय पक्षांना मंदिर उघडण्याची व तेथे ढोल बडविण्याची घाई झाली होती. तर लोकही आता करोनाबाबत गंभीरता हरवताना दिसत आहेत. यातून करोनाची दुसरी लाट टाळता येणार नाही. त्याची तीव्रता लोक किती काळजी घेणार यावर अवलंबून असेल,” असे राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

डिसेंबर-जानेवारीदरम्यान दुसरी लाट

“२५ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान करोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल,” असे राज्य कृती दलाचे सदस्य व कॉलेज ऑफ फिजिशियन चे अधिष्ठाता डॉ. शशांक जोशी म्हणाले. “एकीकडे लोक मास्कचा फारसा वापर करत नाहीत तर दुसरीकडे सुरक्षित अंतराचे सारे नियम धाब्यावर बसवले आहेत. याचा जसा परिणाम होणार आहे तसाच हवामानातील बदलामुळे आगामी काळात सर्दी खोकला फ्लूचे रुग्ण वाढतील. यातून प्रतिकारशक्ती कमी झालेल्यांना करोनाचा फटका बसू शकतो. दुसरी एक लक्षात आलेली बाब म्हणजे ताप किंवा अन्य करोनाची लक्षणे दिसूनही आता स्वत:च उपचार करायची प्रवृत्ती वाढली आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यापेक्षा एचआर सिटी स्कॅन काढून उपचार करणारेही अनेक आहेत. धारावीसह मुंबईतील झोपडपट्टी भागात करोनाचे प्रमाण लक्षणीय कमी झालेले दिसते. यात लोकांमध्ये हार्ड इम्युनिटी तयार झाली असे मानण्यास वाव आहे. मात्र तशी परिस्थिती मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वस्तीत नाही,” असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

… तर ‘पानिपत’ अटळ

“मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेचा निश्चित चांगला परिणाम झाला आहे. तसेच वृद्ध आणि कोमॉर्बिड लोकांचाही शोध घेण्यात आला आहे. त्याच्या परिणामी दिवाळीपूर्वी करोनाची राज्याची व मुंबईची आकडेवारी वेगाने कमी झाली हे खरे असली तरी दिवाळीत लोकांनी सर्व निर्बंध धुडकावून लावले. हीच परिस्थिती यापुढेही राहिली तर ‘पानिपत’ अटळ आहे,” असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second wave coronavirus might come in december january people are behaving careless says doctors jud
First published on: 18-11-2020 at 14:37 IST