पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना येथील एका तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. यामध्ये चार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, आणखी एक जण फरार असून, त्याचा शोध सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याची तक्रार या भाविकांनी केली आहे.

या बाबत या हल्ल्यात जखमी प्रदीप महादेव पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ३२ ज्येष्ठ नागरिकांचा एक गट विठ्ठल दर्शनासाठी येथे आले होते. मंदिराच्या पश्चिमद्वार येथे मंगळवारी पहाटे हे सर्व जण काकड आरतीसाठी उभे होते. या वेळी येथे दुचाकीवरून आलेल्या या टोळक्याशी त्यांचा वाद झाला.

यामध्ये संबंधित तरुणांनी या ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ करतानाच बेदम मारहाण केली. यामध्ये स्टीलची बादली, पेवर ब्लॉकने बेदम मारहाण केली. यामध्ये चार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यानंतर हे टोळके लगेच घटनास्थळावरून पसार झाले. मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे.

या बाबत शहर पोलीस ठाण्यात प्रदीप महादेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, आणखी एक जण फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली आहे.

या मारहाणीत फिर्यादी प्रदीप पाटील, दिलीप वर्णे, नंदकिशोर मोरे, राऊत आप्पा चलवादी (सर्व रा. पुणे) हे जखमी झाले. तर यातील एक भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून हल्लेखोरांपैकी स्वप्नील अहिरे, माउली लोंढे या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील आणखी एक तिसरा फरार असून, त्याचा तपास करीत आहे. या बाबत पोलीस कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका

वास्तविक पाहता मंदिराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा आहे. हा हल्ला झाल्यावर येथे एकच गोंधळ, आरडाओरडा झाला. या ज्येष्ठ नागरिकांपैकी एका भाविकाने तातडीने मंदिर परिसरातील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. मात्र, तेथील पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला होत असताना त्यांनी घेतलेल्या या बघ्याच्या भूमिकेवर या वेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पंढरीत भाविकांची गर्दी कायम असते. अशा वेळी छोट्या मोठ्या मारहाण, गुन्ह्याच्या घटना कायम घडत असतात. त्यावर पोलीस तातडीने कारवाई करत नसल्याबद्दल नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वार येथे मंगळवारी पहाटे भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली. याची मंदिर समितीने दखल घेतली आहे. संबंधित हल्लेखोरांवर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक सहकार्य केले जाईल. तसेच भाविकांबाबत असे प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनासह खबरदारी घेण्यात येत आहेत. – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती.