नांदेड/हिंगोली : शेतीकाम करण्यासाठी मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह कठडे नसलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नांदेडजवळील लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव शिवारात सकाळी हा अपघात झाला. या घटनेत दोन महिला व एका पुरुषाला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तर मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

घटनेतील मृत व जखमी हे वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील गुंज गावचे आहेत. सलग सहा तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व सातही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ताराबाई जाधव (३५), ध्रुपता जाधव (१८), सरस्वती भुरड (२५), सिमरन कांबळे (१८), चउत्राबाई पारधे (४५), ज्योती सरोदे (३०) सपना ऊर्फ मीना राऊत (२५) अशी मृतांची नावे आहेत. तर पार्वतीबाई बुरुड (३५), पुरभाबाई कांबळे (४०), सटवाजी जाधव (५५) अशी बचावलेल्या तिघांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, नांदेड, हिंगोलीतील आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे पथक, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांन घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला विहिरीतील पाण्याचा उपसा करून त्यानंतर क्रेनच्या साह्याने ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात आला. सर्व मजूर हे ट्रॉलीखाली अडकले होते. त्यानंतर एक-एक मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सातपैकी चार मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात, दोन मृतदेह नांदेड जिल्ह्यातील निळा व एक मृतदेह लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल, पोलीस आणि पंचायत विभागाने तातडीने स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी मदतीसाठी रवाना केले. दरम्यान, या अपघातामुळे कठडे नसलेल्या विहिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नांदेड येथे झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्याप्रति शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना. दुर्घटनेतील पीडितांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील कठडे नसलेल्या विहिरींची जिल्हा प्रशासनाकडून गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे. या संदर्भाने उपाययोजना करण्याची सक्ती संबंधितांना केली जाणार आहे.महेश वडदकरनिवासी उपजिल्हाधिकारी