सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आदींसह अन्य मागण्यासाठी शुक्रवारी (दि. 15 ऑगस्ट) बुधगाव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी शनिवारी दिली.
या मेळाव्याला राजू शेट्टी, आ सतेज पाटील, बङ्खू कडू, किसान सभेचे अजित नवले आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गिरीश फोंडे, ड. गजेंद्र येळकर, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, शिवाजी घोडके हेही उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा शुक्रवारी दुपारी बारा वाजता इशिता मंगल कार्यालय येथे होणार आहे. मेळाव्या पूर्वी बुधगांव येथील बाधित शेतीमध्ये झेंडा वंदन होणार आहे. त्या नंतर मेळाव्यास प्रारंभ होणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे. जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊ दिलेली नाही. अधिकार्यांना पिटाळून लावण्यात आले आहे. मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे.या महामार्गामुळे ऊस, द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणार आहेच मात्र सांगली, सांगलीवाडी, कर्नाळ, पद्माळे आदींसह कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावे पाण्याखाली जाणार आहेत. बुधगाव ते दानोळी असा सुमारे 15 किमी उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे. या पुलाचा 20 ते 25 फूट भराव असणार आहे. त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेती वाचविण्याबरोबरच शहरे आणि गावे वाचविण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा आदींसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटले असून भूसंपादनालाही विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात जमिनीचे रेखांकन करणार्या अधिकार्याना शेतकर्यांच्या संघटित विरोधामुळे रेखांकन करता आले नाही. तरीही शासनाकडून महामार्गासाठी पुढील हालचाली सुरूच राहिल्याने आता आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खराडे, देशमुख, साखळकर यांनी केले आहे.