कराड : गणेशोत्सवात प्रखर प्रकाशझोतास (लेझर लाईट्स) परवानगी राहणार नसून, आवाजाच्या भिंती मर्यादेतच वाजल्या पाहिजेत असे बजावताना, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

कराडमध्ये सार्वजिक गणेश मंडळांच्या कार्याकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, रणजित पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, प्रखर प्रकाशझोताच्या प्रदर्शनाला अजिबात परवानगी राहणार नाही. तर, सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. त्याच मर्यादेत आवाजाच्या भिंती वाजल्यास संबंधित डीजे, ध्वनिवर्धक कंपनीचे मालक, चालक यांच्यावर पहिल्यांदा आणि नंतर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. मात्र, मर्यादित आवाजात आवाजाच्या भिंती वाजवण्यास जिल्ह्यात परवानगी नाकारली नाही. आवाजाच्या भिंती वाजताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबलच्या नियमातच वाजल्या पाहिजेत. अन्यथा, संबंधित मालक, चालकांवर, तसेच मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील. जाणीवपूर्वक उत्सवावर विरजण पडेल, अशी प्रशासन भूमिका घेणार नसल्याची ग्वाही देताना, जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शंभूराज यांनी केले.

सिंदूर देखावे सादर करता येणार का? यावर ते म्हणाले, भारत-पाकिस्तान विषयावर देखावा जरूर करावा. मात्र, सिंदूर ऑपरेशन देखावे दाखवताना जातीय तणाव निर्माण होणार नसल्याची काळजी घ्यावी. यासाठी संबंधित देखाव्यांची संहिता नगरपालिका, पोलीस आणि प्रशासनाने तपासून घ्यावी. जातीय तणाव निर्माण होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनीही लक्ष ठेवावे. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

रात्रीची मुदत वाढवण्यासाठी प्रयत्नशील

गणेशोत्सवात तीनच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली गेली आहे. मात्र, गेल्या वर्षी ती पाच दिवस होती. त्यावर शंभूराज म्हणाले, पाच दिवस रात्री १२ पर्यंत गणेशोत्सव आणि नवरात्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना परवानगी दिली होती. आता नवीन आदेश काय आहेत, याची माहिती घेईन, आणि त्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती माहिती अवगत करून पुन्हा पाच दिवस परवानगी मिळण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करेन, अशीही ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली.