Sharad Pawar Speaks on BMC Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला अधिसूचना जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, तीन महिन्यांच्या आत निवडणुका घेण्यासही सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे निवडणूक प्रक्रियेची चर्चा असताना दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेत राजकीय पक्ष आघाडीत लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात सामान्य नागरिकांप्रमाणेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केलं. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन प्रमुख मित्रपक्ष व इतर सहकारी पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात शरद पवारांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांनी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलं.

काय म्हणाले शरद पवार?

“अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. त्या निकालानंतर आता निवडणुका लांबवता येणार नाहीत. त्यामुळे साधारण तीन महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. आमचा निर्णय अद्याप झालेला नाही. अजून आम्ही चर्चा केलेली नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना व इतर छोटे पक्ष असे आम्ही सगळे एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का? यावर विचार करू. त्याबाबत अंतिम निर्णय करून आमची एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीचं काय?

दरम्यान, यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगर पालिका निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये स्वतंत्र की एकत्र? याबाबत चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस आहे. मात्र, मुंबईचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त असल्याचं शरद पवारांनी नमूद केलं आहे.

“मुंबईबाबत अजून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईत आमच्या सगळ्यांमध्ये अधिक शक्तीस्थान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्यात विचारात घ्यावं लागेल”, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का?

दरम्यान, एकीकडे शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेषत: मुंबई महानगर पालिका निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचे संकेत दिलेले असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा चालू आहेत. त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यातदेखील भाष्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. काय होणार? होणार का? मी म्हणतो होणार की नाही होणार, ते लवकरच सर्वांना कळेल. तुमच्या (कार्यकर्ते) सर्वांच्या जे मनात आहे, राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करेन. पण मराठी माणसाची युती होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये. म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंशी युती करण्याचे संकेतच दिल्याचं बोललं जात आहे.