मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं आणि उपोषणांनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी त्यांचं आंदोलन चालू ठेवलं आहे. अशातच कथित किर्तनकार अजय बारसकर आणि स्री शक्ती संस्थेच्या अध्यक्षा संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आरोप केला आहे की, शरद पवार हे मनोज जरांगेंचे बोलविता धनी आहेत. वानखेडे आणि बारसकरांच्या आरोपांचा दाखला देत असेच आरोप सत्ताधारी पक्षदेखील करू लागले आहेत. आज (२७ फेब्रुवारी) विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले.

मनोज जरांगे हे शरद पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांना स्वतः पवारांनीच उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासारख्या एखाद्या जबाबदार पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवं. त्यांचं वक्तव्य हे पोरकटपणाचं आहे. एखादी जबाबदार व्यक्ती इतखं खोटं बोलताना मी यापूर्वी कधी पाहिलं नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचं वर्तन पाहिलं आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अशा प्रकारचं वर्तन मी कधी पाहिलं नव्हतं.

शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे आणि माझ्या संबंधांबद्दल बोलायचं झाल्यास मी आतापर्यंत त्यांना केवळ एकदाच भेटलो आहे. जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे त्यांचं उपोषण सुरू झाल्यावर मी त्यांना सर्वात आधी भेटायला गेलो होतो. मी त्या भेटीवेळी त्यांना सांगितलं की, तुमच्या मागण्या मी समजू शकतो. परंतु, हे आंदोलन करत असताना दोन समाजांमधील अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकेल असं आंदोलन करा. त्यावेळी आम्हा दोघांमध्ये एवढंच संभाषण झालं. त्यानंतर आजअखेर एका शब्दाने आमचं बोलणं नाही की भेट नाही. असं असतानाही त्या दोघांनी (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री) माझ्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं.

हे ही वाचा >> “संगीता वानखेडेंचा सत्ताधारी आमदारावर विनयभंगाचा आरोप, SIT चौकशी करा”, जयंत पाटलांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांचा सरकारला आव्हान

दरम्यान, राज्य सरकार याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करणार आहे. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, तुम्हाला चौकशी करायची असेल तर अवश्य करा. त्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक करा, एसआयटी नेमा, तुम्हाला वाट्टेल ते करा आणि चौकशी पूर्ण करा. कर नाही त्याला डर कशाची? आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. सत्ताधारी लोक म्हणत आहेत की, फोन केले होते, तसं वाटत असेल तर आमचे फोन तपासा आणि मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन तपासा. माझ्या फोनवरून एक जरी फोन केल्याचं सिद्ध झालं तर तुम्हाला वाट्टेल ती गोष्ट मी मान्य करेन.