गांधी कुटुंबीयांनी या देशासाठी बलिदान दिले. या कुटुंबाचे देशासाठीचे योगदान लक्षात न घेता राहुल गांधी यांच्या भीतीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयला हाताशी धरून राजीव गांधी यांच्यावरील खटला न्यायालयात मुद्दाम दाखल केला आहे. राजीव गांधी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतरही केवळ गांधी कुटुंबाच्या बदनामीसाठीच हे षड्यंत्र रचण्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूल क्रीडांगणावर आयोजित जाहीर सभा झाली. या वेळी पवार यांनी गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुडाच्या राजकारणावर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जो काही झंझावात सुरू केला आहे त्याच्या भीतीपोटी पंतप्रधानांनी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतरही राजीव गांधी यांच्याविरोधातील बंद झालेला खटला न्यायालयात दाखल केला आहे. केवळ गांधी कुटुंबाच्या बदनामीसाठीच हे षड्यंत्र असल्याचेही ते म्हणाले.

या देशात सुडाचे राजकारण चालत नाही हे मोदींनी लक्षात घ्यायला हवे. जनतेचे डोळे हे सातत्याने नेत्यांवर असतात, सत्तेचा गैरवापर केला की जनताच तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकून देते. मोदी यांचेही तसेच होणार आहे असेच काहीसे चित्र देशात आहे. सत्तेत राहून लोकांचे भले करा, तसे केले नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

वन, उद्योग व खनिज संपत्तीत आघाडीवर असलेल्या या जिल्हय़ाचे नाव प्रदूषणात देशात क्रमांक एकवर आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. वेकोलिच्या खाणींच्या खड्डय़ात गोळा झालेले पाणी शेती तसेच शहराला प्रक्रिया करून पुरविण्यात यावे, याबद्दल आपण आजच भ्रमणध्वनीवरून कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली व त्यांनी ही बाब मान्य केल्याचेही सांगितले. आगामी निवडणुकीत चंद्रपुरात परिवर्तनाची पताका फडकेल आणि देशाला त्यातून योग्य मार्ग दाखविला जाईल, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केला.

११ डिसेंबरला मोर्चा

राज्यातील शेतकरी आत्महत्या, फसलेली कर्जमाफी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सरकारचे त्याकडे झालेले दुर्लक्ष बघता ११ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला बोल मोर्चा’ राहणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस १ डिसेंबरला यवतमाळ ते नागपूर पायदळ दिंडी काढणार आहे. ही दिंडी ११ रोजी सकाळी नागपूरला पोहोचणार असून तिथे मोर्चात रूपांतर होणार आहे. या दिंडीत लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.

जेवणाचा वाद

शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या घरी भेटी देण्याचा कार्यक्रम केला. सकाळी माजी आमदार अ‍ॅड्. एकनाथराव साळवे, त्यानंतर अ‍ॅड्. बाबा वासाडे, राजेंद्र वैद्य व माजी नगरसेवक संजय वैद्य, बेबी उईके, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे व नगरसेविका आखरे यांच्या घरी भेट दिली. पवार यांनी आपल्या घरी जेवणासाठी यावे यावरून स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाले. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार आणि कार्यकर्तेही नाराज होणार म्हणून पवार यांनी वैद्य व वासाडे यांच्या घरी जेवण घेण्यास नकार दिला. त्यांनी विश्रामगृहावर जेवण करणे पसंत केले.