अहिल्यानगर : राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्याचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र या संकटावर मात करत पुढे जायला हवे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे. केडगाव उपनगरातील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार नीलेश लंके, आमदार अशुतोष काळे, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, डॉ. पोपटराव पवार, माजी आमदार दादा कळमकर व राहुल जगताप, रयतचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील. माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. सध्या शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या सर्वांचा स्वीकार करून रयत संस्थेचा कारभार यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते म्हणाले की, रयतच्या प्रत्येक शाखेत कृत्रिम बुध्दिमत्तेचे ज्ञान दिले जाते.

शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल व तंत्रज्ञान येत आहेत त्यांचा स्वीकार करूनच संस्थेची वाटचाल सुरू आहे. नवीन आव्हानांचा विचार संस्था नेहमीच करते. त्यामुळेच नवीन पिढी घडवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे मिशन हाती घेत ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला. अहिल्यानगर जिल्ह्याने कर्मवीरांना मोलाची साथ दिल्यानेच ‘रयत’चे मोठे जाळे जिल्ह्यात तयार झाले. स्व. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे आदी नेत्यांनी त्यात मोलाचे योगदान दिले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक शालेय समितीचे किसन सातपुते, रावसाहेब सातपुते, गणेश सातपुते, महेश गुंड, रामदास येवले, माजी नगरसेवक सुनील कोतकर, मनोज कोतकर, प्रशांत कोतकर आदी उपस्थित होते. प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी प्रास्ताविक केले.

‘रयत’चा कारभार पेपरलेस होणार

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी म्हणाले की, इंग्रजी शाळांसारखा दर्जा व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचे काम संस्था करीत आहे. संस्था लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करत असून लवकरच ‘रयत’चा कारभार पेपरलेस होईल.